चेन्नई -भारतीय रिझर्व्ह बँकेने पर्यवेक्षण आणि नियमन करणारे विशेष केडर स्थापन करण्याचा आज निर्णय घेतला आहे. हे केडर व्यावसायिक बँका, शहरी कोऑपरेटिव्ह बँक आणि बिगर बँकिंग बँकिंग कंपन्यांचे नियमन आणि पर्येवक्षण करण्याच्या कामाला बळकटी देण्यासाठी स्थापण्यात येणार आहे.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील आरबीआयच्या संचालक मंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीला डेप्युटी गव्हर्नर एन.एस. विश्वनाथन, डॉ. विराल व्ही. आचार्य, डॉ.बी.पी कानुनगो आणि महेश कुमार हे उपस्थित होते. याचबरोबर भारत दोषी, सुधीर मांकड, मनीष साबरवाल, सतीश मराठे आणि स्वामीनाथ गुरुमुर्ती हेदेखील उपस्थित होते.
बैठकीदरम्यान आरबीआयच्या संचालक मंडळाने आर्थिक स्थिती, जागतिक आणि देशातील आव्हाने आणि आरबीआयच्या विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला. तत्पूर्वी आरबीआयच्या संचालक मंडळाचे माजी संचालक तथा आयटीसी चेअरमन वाय.सी. देवेश्वर यांना सदस्यांनी श्रद्धांजली वाहिली.
चलनाच्या व्यवस्थापनाचीही संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी आरबीआयच्या पर्यवेक्षण करण्याच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. तसेच विविध क्षेत्रांच्या विकासामुळे त्यांच्यात परस्पर संबंध येत असल्याने होणाऱ्या वित्तीय गुंतागुंतीचाहा मुद्दाही चर्चेत आला. वित्तीय सचिव व अर्थव्यवहार विभागाचे सचिव सुभाष चंद्र गर्ग आणि वित्तीय सेवा विभागाचे सचिव राजीव कुमार हेदेखील बैठकीला उपस्थित राहिले होते.