मुंबई -भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) रेपो दरात बदल केलेला नाही. मागील पतधोरणाप्रमाणे आरबीआयकडून 4 टक्के रेपो दर कायम ठेवण्यात आला आहे. यासह घरासह इतर कर्जाची ईएमआय कमी होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के ठेवण्यात आला आहे.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी आरबीआयचे पतधोरण जाहीर केले आहे. पतधोरण समितीच्या तीन दिवसीय बैठकीनंतर रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक 2 जूनपासून सुरू झाली. या बैठकीत रेपो दर 'जैसे थे' ठेवण्याचा बहुमताने निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा-नवीन डिजीटल कायद्याच्या अंमलबजावणीकरिता केंद्राची ट्विटरला अंतिम नोटीस
रेपो दर व रिव्हर्स रेपो दर म्हणजे काय?
जेव्हा आरबीआय रेपो दर कमी करते तेव्हा कर्ज स्वस्त होते. उलट रेपो दर वाढला की कर्ज महाग होते. आरबीआयकडून दर दोन महिन्यांनी रेपो दरांचा आढावा घेण्यात येतो. रेपो दराप्रमाणे बँका आरबीआयकडून कर्ज घेतात. सर्वसाधारणपणे बँकांचा कर्जाचा दर रेपो रेटवर अवलंबून असतो. एमपीसी सदस्य रेपो दरात बदल ठरवतात. रिव्हर्स रेपो दरावर बँकांना आरबीआयकडे जमा झालेल्या पैशांवर व्याज मिळते.