मुंबई- कोरोनामुळे वित्तीय बाजारपेठेवरील परिणाम कमी करण्यासाठी आरबीआयने अनेक पर्याय तयार ठेवले आहेत. रेपो धोरणावरील निर्णय पतधोरणाच्या समितीत घेण्यात येणार असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. आधीच मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला कोरोनाने मोठा फटका बसत आहे. अशा स्थितीत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास पत्रकार परिषद घेत आहेत.
येस बँकेतील सर्व ठेवीदारांचे पैसे सुरक्षित आहेत. त्यामुळे बँक खात्यामधून पैसै काढण्यासाठी खातेदारांनी घाई करू नये. ठेवीदारांनी चिंताग्रस्त होवू नये, असे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले.
शक्तिकांत दास म्हणाले, खासगी शेड्युल्ड बँकांतील ठेवीदारांचे पैसे आजवरच्या इतिहासात कधीच बुडाले नाहीत. येस बँकेचे अनेक खातेदार एकनिष्ठ राहिले आहेत. काही राज्यांनी खासगी बँकांची खाती बंद केली आहेत. त्यांनी पुन्हा खासगी बँकांवर विश्वास ठेवावा, असे शक्तिकांत दास यांनी आवाहन केले. येस बँकेला चलनाची तरलता भासली तर आणखी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम-
पुढे ते म्हणाले, कोव्हिड ही जागतिक महामारी घोषित करण्यात आली आहे. त्याचा जगभरातील वित्तीय बाजारपेठांवर परिणाम होत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. देशात १०० हून अधिक जणांना कोविड-१९ लागण झाली आहे. कोरोनाने उद्भवलेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार हे युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. कोरोनाचा जागतिक आणि देशातील अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पर्यटन, विमान, आदरातिथ्य आणि प्रवासी वाहतूक क्षेत्रांवर परिणाम होत आहे. हीच परिस्थिती राहिली तर पुनरावलोकन करावे लागणार आहे. अशा स्थितीत आरबीआयने वित्तीय बाजारपेठेतील विश्वास टिकविण्यासाठी निर्णय घेतले आहेत.
- स्वॅप अॅक्शन - डॉलरची विक्री करणे. बाजारातील चलनाची तरलता टिकविण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे.
- एलटीआरओवर आधारित पतधोरणाचे अवलोकन करण्यात येणार आहे.
- गर्दी टाळण्यासाठी डिजीटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी ग्राहकांना जावे लागणार नाही. त्यासाठी बँकांना निर्देश देण्यात येणार आहेत.