मुंबई - पंजाब आणि महाराष्ट्र को-ओपरेटिव्ह बँकेतील ४ हजार कोटींचा घोटाळा उघडकीला आल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) महत्त्वपूर्ण बदल केला आहे. सहकारी बँकांकडून आरबीआयला रोज माहिती देणाऱ्या व्यवस्था (डेली रिपोर्टिंग सिस्टिम) ही ई-मेलच्या ऐवजी ऑनलाईन पोर्टलवर आधारित करण्यात आली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व सहकारी बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना परिपत्रक पाठवून ई-मेलऐवजी वेबवर आधारित केंद्रीय व्यवस्थेचा वापर करण्यास सांगितले आहे. सध्या आरबीआयकडून बेसिक स्टॅस्टिकल रिटर्न (बीएसआर) या यंत्रणेचा वापर केला जातो. त्याऐवजी आरबीआयकडून बँकिंग पायाभूत सुविधांसाठी असलेल्या केंद्रीय माहिती व्यवस्थेचा (सीआयएसबीआर) वापर करण्यात येणार आहे. या यंत्रणेत सहकारी बँकांना सर्व माहिती सीआयएसबीआयच्या पोर्टलवरून एकाच फॉर्ममधून ऑनलाईन भरावी लागणार आहे. यापूर्वी सहकारी बँकांकडून वेगवेगळ्या कागदपत्रांमधून आरबीआयला माहिती दिली जात होती.