नवी दिल्ली -विमा क्षेत्रात ७४ टक्क्यापर्यंत थेट विदेश गुंतवणूक (एफडीआय) करण्यासाठी राज्य सभेत विधेयक मंजूर करण्यात आले आहे. यापूर्वी विमा क्षेत्रात ४९ टक्क्यापर्यंत थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी होती.
विमा विधेयक (दुरुस्ती) २०२१ सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, थेट विदेशी गुंतवणुकीने देशात दीर्घकाळ स्त्रोत निर्माण होणार आहेत. देशात विमा योजनेसाठी नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. हे विधेयक आवाजी मताने मंजूर करण्यात आले आहे. विमा क्षेत्रात एफडीआयचे प्रमाण ७४ टक्के करण्यापूर्वी विमा नियामक संस्था आयआरडीएआयसह विविध भागीदारांशी चर्चा करण्यात आली आहे.