नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देशाच्या घसरलेल्या राष्ट्रीय सकल उत्पादनावरून (जीडीपी) सावधानतेचा इशारा दिला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जूनमध्ये घसरलेला जीडीपी हा प्रत्येकासाठी धोक्याची घंटा असल्याचे मत रघुराम राजन यांनी व्यक्त केले. राजन यांनी लिंक्डइन समाज माध्यमात देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी भाष्य केले आहे. केंद्र सरकारने अशा परिस्थितीत मदत अथवा दिलासा देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
सरकारने केलेले प्रयत्न हे अपुरे असल्याचे मत रघुराम राजन यांनी व्यक्त केले. त्यांनी लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटले, की पहिल्या तिमाहीतील आकडेवारीत असंघटित क्षेत्राचा विचार केला तर २३.९ टक्क्यांची जीडीपीमध्ये झालेली घसरण ही आणखी वाईट असू शकते.
भारताच्या तुलनेने कोरोनाचा अधिक फटका बसलेल्या इटलीच्या जीडीपीत १२.४ टक्के तर अमेरिकेच्या जीडीपीत ९.५ टक्क्यांची घसरण झाली आहे. जोपर्यंत कोरोनाचा संसर्ग सुरू राहिल तोपर्यंत रेस्टॉरंटसारख्या सेवा उद्योगातील रोजगारावर आणि त्यामधील खर्चावर परिणाम होणार आहे. अशा परिस्थितीत सरकारने मदत करण्याची अधिक गरज आहे.
हेही वाचा-'मोदी सरकारचा 'गब्बर सिंग टॅक्स' जीडीपी घसरण्याचं सर्वात मोठं कारण'