नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सुधारणांवर आज दुसरी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी सरकारी बँकांच्या नफ्यात सुधारणा झाल्याचे सांगितले. सरकारी बँकांचा असलेली एकूण अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) घटून ७.९ लाख कोटी झाल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १४ सरकारी बँकांनी नफा नोंदविल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. २०१९ मध्ये मार्चअखेर ७.९ लाख कोटी तर २०१८ मध्ये डिसेंबरअखेर ८.६५ कोटींचा एनपीए होता, अशी त्यांनी माहिती दिली.
एनबीएफसी आणि गृहकर्ज कंपन्यांचा वाढला वित्तपुरवठा -
बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या आणि गृहकर्ज देणाऱ्या कंपन्यांना होणारा वित्तपुरवठा वाढल्याचे सीतारामन यांनी सांगितले. एनबीएफसी आणि गृहकर्ज करणाऱ्या कंपन्यांना ३ हजार ३०० कोटींची पतपुरवठा झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात ३० हजार कोटींचा पतपुरवठा होणार असल्याची त्यांनी माहिती दिली.
नीरव मोदीने स्विफ्ट यंत्रणेतील त्रुटीचा फायदा घेवून पंजाब नॅशनल बँकेची सुमारे १४ हजार कोटींची फसवणूक केली होती. असे प्रकार टाळण्यासाठी स्विफ्ट मेसेजिंग यंत्रणा ही कोअर बँकिंगशी जोडण्यात आल्याते सीतारामन यांनी सांगितले.