मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देश आर्थिकदृष्ट्या रसातळाला जात असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. सर्व अपयश झाकण्यासाठी केंद्रात मोदी सरकार आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार विकास दर फुगवून सांगत आहेत. हे वेळोवेळी अनेक अर्थतज्ज्ञांनी स्पष्ट केल्याचे चव्हाण यांनी गांधी भवनमधील पत्रकार परिषदेत सांगितले.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी घसरलेल्या अर्थव्यवस्थेवरून राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, देशात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे संपत आहेत. आर्थिक विकास दरही इतर लहान देशांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर देश एका भयंकर आर्थिक अरिष्टात सापडेल, अशी भीतीही चव्हाण यांनी व्यक्त केली.
उद्योगांना तातडीने जीएसटीमध्ये सवलत द्यावी-
देशातील वाहन उद्योग आणि बांधकाम उद्योग हे मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडले आहेत. या उद्योगांना तातडीने जीएसटीमध्ये सवलत देण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली. लहान-मोठ्या बँका आणि पतसंस्था यांना कर्ज पुरवणाऱ्या एनबीएफसी संस्थांनाही सवलत द्यावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
हेही वाचा- तरुण पिढी ओला व उबेरचा वापर करत असल्याने वाहन उद्योगावर परिणाम
राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ७१ हजार कोटींचे मोठे घोटाळे -
देशातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ७१ हजार कोटींचे मोठे घोटाळे झाले आहेत. हे घोटाळे झालेले पैसे हे जनतेच्या ठेवीतील आहेत. या घोटाळ्याला जबाबदार कोण? असा त्यांनी सवाल केला. बँकेतील घोटाळ्यांसाठी जबाबदार असलेल्या सर्व उद्योगपती, राजकारणी, मंत्री व अधिकारी यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.