मुंबई - पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेत पैसे अडकलेल्या ठेवीदारांनी ऐन दिवाळीत आरबीआय कार्यालसमोर निदर्शने केली आहेत. बँकेतील पैसे परत करावेत, अशी ठेवीदारांनी मागणी केली आहे.
पीएमसीच्या ठेवीदारांनी वांद्रा कुर्ला कॉम्पलेक्समध्ये निदर्शने केली. त्यानंतर ठेवीदारांच्या प्रतिनिधींनी आरबीआयचे मुख्य सरव्यवस्थापक दर्जाच्या अधिकाऱ्याची भेट घेतली. यावेळी ठेवीदाराच्या प्रतिनिधीने मागणीचे पत्र दिले. यावेळी ठेवीदारांनी 'ब्लॅक दिवाली' असे बॅनर हातामध्ये घेतले होते.
अडचणीत सापडलेल्या बँकेमधील पैसा सुरक्षित असल्याची आरबीआयने खात्री द्यावी, अशी आरबीआय अधिकाऱ्यांना विनंती केल्याचे ठेवीदारांचे प्रतिनिधी जित्शू शेठ यांनी सांगितले. प्रत्येक ठेवीदाराचे पैसे सुरक्षित ठेवण्याला प्राधान्य असल्याचे आरबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच आरबीआयने पीएमसीला ४ हजार कोटींची मदत करावी, अशी त्यांनी विनंती केली.