मुंबई - पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील पैसे खातेदारांना तातडीच्या वैद्यकीय खर्चासाठी काढता येवू शकतात. अशा ठेवीदारांनी पीएमसीच्या प्रशासकाशी संपर्क साधू शकतात, अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने मुंबई उच्च न्यायालयाला दिली.
आरबीआयने लादलेल्या निर्बंधावर पीएमसीच्या ठेवीदारांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर आरबीआयने प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर देत लग्न, शिक्षण व दैनंदिन अशा अडचणींच्या काळासाठी ५० हजार रुपये ठेवीदारांना काढता येतील, असे म्हटले आहे. वैद्यकीय खर्चाकरिता ठेवीदार हे १ लाख रुपयापर्यंतचे पैसे काढण्यासाठी आरबीआय प्रशासकाशी संपर्क करू शकतात, असे आरबीआयचे वकील व्यंकटेश धोंड यांनी न्यायालयात सांगितले. बँक आणि ठेवीदारांचे हितसंरक्षण करण्यासाठी पैसे काढण्यावर निर्बंध असण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.