नवी दिल्ली - मुंबईत पेट्रोलच्या किमतीने प्रति लिटर १०० रुपयांचा टप्पा शनिवारी ओलांडला आहे. देशात पेट्रोलचे दर प्रति लिटर २६ पैसे तर डिझेलचे दर २७ पैशांनी वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.
मे महिन्यात १५ वेळा पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. इंधन दरात आज पुन्हा वाढ झाल्याने पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीने नवा उच्चांक गाठला आहे. यापूर्वीच राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पेट्रोलचे दर प्रति लिटर शंभरीपार गेले आहेत. मुंबई पेट्रोलचे दर प्रति लिटर १००.१९ रुपये तर डिझेलचे दर ९२.१७ रुपये प्रति लिटर आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ९३.९४ आणि डिझेलचा दर प्रति लिटर ८४.८९ रुपये आहे.
हेही वाचा-१५ जूननंतर दागिन्यांवर हॉलमार्क अनिवार्य, जाणून घ्या हॉलमार्किंग म्हणजे काय?
सरकारी तेल कंपन्यांनी ४ मेपासून १५ वेळा इंधनाचे दर वाढविले आहेत. तर पश्चिम बंगालसारख्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडताना १८ दिवस इंधन दर स्थिर राहिले होते. सरकारी तेल कंपन्यांकडून जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीचा रोज आढावा घेतला जातो. त्यानुसार इंधनाचे दर निश्चित करण्यात येतात.
हेही वाचा-कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला दिलासा; इंडियन बँकेकडून १०२ जणांना नोकरी