नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात आर्थिक मदत म्हणून गरिबांना केंद्र सरकारकडून ३१ हजार २३५ कोटी रुपये मिळाले आहेत. कोरोनाच्या संकटात गरिबांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजची (पीएमजीकेपी) घोषणा केली होती.
कोरोनामुळे उद्भवलेल्या अडचणींवर मात करता यावी, यासाठी केंद्र सरकारने शेतकरी, गरीब, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी १.७० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. या योजनेचा केंद्र सरकार, राज्य सरकार आणि वित्तीय मंत्रालयाकडून सतत आढावा घेण्यात येत आहे. वित्तीय तंत्रज्ञान कंपन्या आणि डिजीटल तंत्रज्ञान यामुळे लाभार्थ्यांना थेट मदत सहजपणे मिळू शकल्याचे वित्तीय मंत्रालयाने म्हटले आहे. ही आर्थिक मदत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होते.
हेही वाचा-कोरोनाचा अर्थव्यवस्थेला 'संसर्ग'; चालू आर्थिक वर्षात ०.८ टक्के विकासदर!
वित्त मंत्रालयाच्या माहितीनुसार लाभार्थ्यांना अशी मिळाली मदत-
- पीएम- किसान योजनेत ८ कोटी शेतकऱ्यांना त्यांच्या प्रत्येकी खात्यावर २ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहेत.
- जनधन योजनेतील २०.०५ कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यावर प्रत्येकी थेट ५०० रुपये जमा करण्यात आले आहेत.
- राष्ट्रीय सामाजिक मदत कार्यक्रमांतर्गत (एनएसएपी) २.८२ कोटी जणांना १,४०० कोटी रुपयांचे वाटप. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांग यांचा समावेश आहे. या योजनेत प्रत्येकी लाभार्थ्याला ५०० रुपये वितरित करण्यात आले आहेत. पुढील महिन्यात प्रत्येकी लाभार्थ्याला ५०० रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे.
- प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत २.६६ कोटी मुल्यांचे महिला लाभार्थ्यांना मोफत सिलिंडर वाटप
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यानुसार (मनरेगा) एकूण ७ हजार १०० कोटी राज्यांना वितरित करण्यात आले आहेत.
- देशातील २.१७ कोटी इमारत आणि बांधकाम कामगारांना एकूण ३ हजार ४९७ कोटी रुपयांचे राज्यांकडून वाटप करण्यात आले आहेत.
हेही वाचा-शेअर बाजार निर्देशांक ४८३ अंशांनी वधारून बंद; 'या' कंपन्यांचे वधारले शेअर