मुंबई- आरबीआयच्या पतधोरण समितीकडून साधारणत: २५ च्या पटीत बेसिस पाँईटची कपात करण्यात येते. मात्र या पद्धतीला फाटा देत आज ३५ बेसिस पाँईटने रेपो दरात कपात केली आहे. यावर आरबीआयच्या पतधोरण समितीचे अध्यक्ष तथा गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
कमी कालावधीकरता देण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याजदर हे ३५ बेसिस पाँईटने कमी करण्यात आले. त्यामुळे रेपो दर हा ५.७५ वरून ५.४० टक्के झाला आहे. आर्थिक विकासाला चालना मिळण्याकरिता आरबीआयच्या पतधोरण समितीने हा निर्णय घेतला आहे.
आरबीआयच्या पतधोरण समितीचे अध्यक्ष तथा आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, ३५ बेसिस पाँईट ही कपात पुरेशी असल्याचे दिसून आले आहे. तर २५ बेसिस पाँईट ही अपुरी आणि ५० बेसिस पाँईट ही खूप जास्त होती. २५ बेसिस पाँईट ही खूप योग्य नाही तर केवळ पद्धत आहे.
पतधोरण समिती ही पूर्ण क्षमतेने, योग्य असे पतधोरण अधिक प्रभावशाली पद्धतीने आणू शकते. त्यासाठी ३५ बेसिस पाँईटने रेपो दरात कपात करण्यात आली आहे.
आरबीआयने पतधोरणात जुळवून घेण्याला प्राधान्य दिले आहे, मात्र ते अधिक प्रमाणात नाही. जर २५ बेसिस पाँईटची कपात खूप कमी असल्याचे आढळून आले तर ३५ बेसिस पाँईटची कपात होवू शकते. हाच दृष्टीकोन आरबीआयकडून कठोर धोरण अवलंबताना होवू शकते, असेही दास म्हणाले.