मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आर्थिक धोरणाबाबत भारत सरकारला सावध केले आहे. आरबीआयकडून ताळेबंदाचा विस्तार करण्यात येत आहे. अर्थव्यवस्था मंदावलेली असताना अधिक चलनाची तरलता पुरवून आरबीआय सरकारचे कर्ज खरेदी करत आहे. त्याची किंमत ही चुकवावी लागणार असल्याचा इशारा रघुराम राजन यांनी दिला. ते डीबीएस बँकेच्या परिषदेत बोलत होते.
रघुराम राजन हे सातत्याने केंद्र सरकार आणि आरबीआयच्या आर्थिक धोरणातील त्रुटी दाखवून देतात. ते बँकेच्या परिषदेत म्हणाले, की केंद्रीय मध्यवर्ती बँकेचे पतधोरण हा शेवटचा पर्याय होवू शकत नाही. केंद्रीय बँकांकडून पतधोरणाचा रणनीतीसारखा वापर करण्यात येत आहे. जे लोक याला पाठिंबा देत आहेत, त्यांनी स्पष्ट लक्षात ठेवावे, की हा सोपा मार्ग नाही.