नवी दिल्ली- वाहन उद्योग सध्या मंदीतून जात असल्याचे चित्र असताना आणखी चिंता वाढविणारी बाब समोर आली आहे. जपानची आघाडीची वाहन कंपनी निस्सान ही देशातील उत्पादन प्रकल्पातून १ हजार ७०० जणांना सेवेतून काढणार आहे. या नोकऱ्या बहुतेक उत्पादन विभागात आहेत.
निस्सान कंपनी जगभरात सहा ठिकाणांवरील ६ हजार १०० जणांना कामावरून कमी करणार आहे. ही प्रक्रिया आर्थिक वर्ष २०२० ते २०२२ पर्यंत चालणार आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २००८ ते २०१९ कालावधीत जगभरातील ८ ठिकाणांवरील ६ हजार ४०० जणांना नोकरीवरून कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.
वाहन उद्योगातील सूत्राच्या माहितीनुसार सेवेतून कर्मचाऱ्यांना कमी केल्याने चेन्नईमधील उत्पादन प्रकल्पावर परिणाम होणार आहे. याबाबत निस्सान मोटर इंडिया कंपनीने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
द रिनॉल्ट आणि निस्सानचा संशोधन आणि विकासाची सुविधा असलेला तामिळनाडूमध्ये उत्पादन प्रकल्प आहे. त्यामध्ये ४० हजार जणांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगार दिला जातो. या प्रकल्पातून दरवर्षी ४.८ लाख वाहनांचे उत्पादन घेण्याची क्षमता आहे.
वाहन उद्योगात मंदीचे चित्र -
वाहन उद्योगावरच वाहनांचे सुट्टे भाग निर्माण करणाऱ्या उद्योगाची प्रगती अवलंबून असते. सध्या १५ ते २० टक्के वाहनांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे वाहनांचे सुट्टे भाग निर्माण करणाऱ्या उद्योगावर मोठे संकट निर्माण झाले आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर १० लाख जणांना नोकऱ्या गमवाव्या लागतील, अशी भीती नुकतेच वाहन उद्योगासंबंधीची संघटना एसीएमएने व्यक्त केली. चालू वर्षात एप्रिलमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत १७ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. हे गेल्या १७ वर्षातील सर्वात कमी वाहन विक्रीचे प्रमाण आहे.
जूनमध्ये महिंद्रा अँड महिंद्राने उत्पादन प्रकल्प ५ ते १३ दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीचा जून तिमाहीत नफा ३२ टक्क्यांनी घसरला आहे.