नवी दिल्ली - 'जी-२०' राष्ट्रसमुहातील अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर यांची दोन दिवसीय बैठक जपानमध्ये ८ जूनला आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून सीतारमन यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे.
सीतारमन यांच्यासोबत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे जपानमधील फुकोडामधील बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
या विषयावर परिषदेमध्ये होणार चर्चा-
जागतिक अर्थव्यवस्थेला भेडसावणाऱ्या समस्या आणि धोक्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. डिजीटल अर्थव्यवस्था होत असताना आंतरराष्ट्रीय कर, कराची जबाबदारी अशा विविध विषयांवरदेखील चर्चा केली जाणार आहे. जागतिक व्यापारातील प्रश्नाबाबतही चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत उपस्थित होणाऱ्या मुद्द्यांबाबत सखोल चर्चा 'जी-२०' नेत्यांच्या परिषदेत केली जाणार आहे. ही परिषद २८-२९ जूनला होणार आहे.