नवी दिल्ली- रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वर्ष २०१९ मध्ये १६.५ अब्ज डॉलरची (१.१२ लाख कोटी) वाढ झाली आहे. त्यामुळे अंबानी यांची संपत्ती एकूण ६०.८ अब्ज डॉलर झाल्याचे ब्लूमबर्ग बिलिनियर्स इंडेक्समध्ये म्हटले आहे.
पेट्रोलियम उत्पादन ते दूरसंचार कंपनी असे विविध उद्योग असलेले अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत असलेले १२ वे व्यक्ती आहेत. रिलायन्सचे सातत्याने वधारणाऱ्या शेअरमुळे अंबानींच्या सपंत्तीत अधिक वाढ झाली आहे. वर्षभरात रिलायन्सचे शेअर हे ४१ टक्क्यांनी वधारल्याचे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीतून दिसून आले.
हेही वाचा-जिओचा असा आहे नवा प्लॅन, ३९ टक्के वाढल्या किंमती
गेल्या काही वर्षात कंपनीने वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसाय सुरू केले आहेत. यामध्ये जिओ, ब्रॉडबँड सेवा देणारी जिओ गिगाफायबर या कंपन्यांचा समावेश आहे. कंपनीने किरकोळ विक्रीतील व्यवसाय अधिक बळकट केला आहे. कंपनी लवकरच अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला टक्कर देण्यासाठी ई-कॉमर्स क्षेत्रात उतरणार आहे.