हैदराबाद - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर करताना भाषण करण्यात येणार आहे. त्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या संज्ञा तुम्हाला सोप्या शब्दात सांगणार आहोत.
- जीडीपी (राष्ट्रीय सकल उत्पादन) - एखाद्या भूप्रदेशात विशिष्ट कालावधीत, सामान्यत: वर्षामध्ये उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे अंतिम मूल्य हे जीडीपी असते. यामुळे देशातील अर्थव्यवस्थेचा विकासदर समजतो.
- वित्तीय तूट (फिस्कल डिफिशियट) - सरकारकडील एकूण महसूल आणि एकूण खर्च यामधील फरक ही वित्तीय तूट म्हणून ओळखली जाते. यामुळे सरकारला कामकाजासाठी किती कर्ज घ्यावे लागणार हे समजू शकते.
- वित्तीय विधेयक (फिस्कल बिल)- कर लागू करणे, कर वगळणे आणि प्रस्तावित करातील नियमन याचा सविस्तर समावेश असणारा अर्थसंकल्प सादर करण्यात येतो. त्यानंतर तातडीने विधेयक संसदेमध्ये आणले जाते. हे विधेयक वित्तीय विधेयक म्हणून ओळखले जाते.
- प्रत्यक्ष कर (डायरेक्ट टॅक्स) - हा कर व्यक्तीला अथवा संस्थांच्या उत्पन्नावर लागू करण्यात येतो.
- अप्रत्यक्ष कर (इनडायरेक्ट टॅक्स) हा कर ग्राहकाकडून खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तूवर आणि सेवांवर लागू करण्यात येतो. जीएसटीसारखे कर हे अप्रत्यक्ष करात लागू करण्यात येतात.
- वित्तीय धोरण (फिस्कल पॉलिसी) - सरकारी कर्ज, वित्तीय तूट आणि कर प्रणालीशी संबंधित धोरण तयार केले जाते.
- सीमा शुल्क (कस्टम ड्युटी) - हा कर निर्यात आणि आयात करण्यात येणाऱ्या वस्तूवर केंद्र सरकारकडून लागू करण्यात येतो.
- अनुदान (सबसिडी) - लोकांना अथवा एखाद्या वर्गाला कल्याणकारक हेतू ठेवून अनुदान दिले जाते. तसेच विविध गोष्टींना प्रोत्साहन म्हणून अनुदान दिले जाते.
- उपकर (सेस)- विशेष्ट उद्देश ठेवून हा उपकर लावण्यात येतो. उदा. स्वच्छता अभियान, कृषी कल्याण यासाठी उपकर लावण्यात येतो.