नवी दिल्ली - देशातील राज्यांची आरोग्यविषयक कामगिरी दर्शविणाऱ्या आरोग्याच्या निर्देशांकाचा दुसरा टप्पा नीती आयोगाने जाहीर केला आहे. यामध्ये केरळ हा पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आंध्रप्रदेश तर तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे.
नीती आयोगाने 'आरोग्यपूर्ण राज्ये, प्रगतीशील भारत : राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या गुणवारीचा अहवाल' प्रसिद्ध केला. यामध्ये मोठी राज्ये, छोटी राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश अशा वर्गवारीत आरोग्य निर्देशांकाची यादी तयार करण्यात आली आहे. आरोग्य निर्देशांकाच्या यादाीत 'बिमारू' समजल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांचे स्थान यादीत शेवटून आहे. गुजरात चौथ्या क्रमांकावर, पंजाब पाचव्या क्रमांकावर तर हिमाचल प्रदेश सहाव्या क्रमांकावर आहे.
या राज्यांची आरोग्य निर्देशांकात सुमार कामगिरी-
उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशाची आरोग्य निर्देशांकात सुमार कामगिरी झाली आहे. छोट्या राज्यांपैकी सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांची आरोग्य निर्देशांकाच्या गुणात सर्वात अधिक घसरण झाली आहे. बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश आणि ओडिशा या राज्यांची एकूण आरोग्य निर्देशांकाच्या गुणात घसरण झाली आहे.