नवी दिल्ली - बनावट नोटांतून तयार होणाऱ्या समांतर अर्थव्यवस्थेला पायबंद घालण्यासाठी मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. मात्र दाऊद कंपनीसह आएएसआय अजूनही बनावट नोटा छापण्यात सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानची आएसआय आणि डी कंपनी ही देशाच्या अर्थव्यवस्थेत बनावट नोटा चलनात आणत असल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एआयए) तपासातून निष्पन्न झाले आहे.
नेपाळमध्ये मुख्य सूत्रधाराला अटक-
भारतीय गुप्तचर विभागाच्या माहितीवरून नेपाळमध्ये पोलिसांनी बनावट नोटांचा मुख्य सूत्रधार युनुस अन्सारी याला अटक केली होती. अन्सारीचे आयएसआय आणि दाऊद इब्राहिमशी जवळचे संबंध असल्याचा भारतीय अधिकाऱ्यांचा दावा आहे. दाऊद हा भारतात बनावट नोटा चलनात आणण्यासाठी सर्वात मोठी भूमिका बजावत आहे. अन्सारीसमवेत पाकिस्तानी नागरिक असलेल्या मोहम्मद अख्तर, नाडिया अन्वर आणि नसिरुद्दीनलाही अटक करण्यात आली आहे. अटकेवेळी पोलिसांनी ७ कोटींचे बनावट भारतीय चलनही जप्त केले होते.
नेपाळ-बांग्लादेशमार्गे देशात आणले जाते बनावट चलन-
अन्सारीच्या अटकेनंतर नेपाळमधून बनावट चलन देशात आणल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. हे चलन बांगलादेशातून पूर्व राज्यांच्या सीमेवरून देशात आणले जाते. बनावट चलनाच्या वितरणाची माहिती एनआएच्या विविध तपासातून समोर आली आहे.