नवी दिल्ली -अमेरिकेने आर्थिक निर्बंध लादल्याने इराणने या महिन्यात भारताला कच्च्या तेलाची विक्री करणे थांबविले आहे. यावर पर्याय म्हणून इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी) या सरकारी कंपनीने कच्चे तेल आयात करण्यासाठी अमेरिका आणि सौदी अरेबियाबरोबर करार केला आहे.
आयओसी ही भारताची सर्वात मोठी तेल कंपनी आहे. या कंपनीसह इतर भारतीय कंपन्यांनी या महिन्यापासून इराणकडून कच्चे तेल खरेदी करणे थांबविले आहे. तेल पुरवठ्याची कमतरता भरून कढण्यासाठी भारताने प्रथमच अमेरिकेच्या दोन पुरवठादारांबरोबर करार केला आहे. हा करार ४६ लाख टन इंधन पुरविण्यासाठी आहे. आयओसीचे संचालक (वित्तीय) ए.के.शर्मा म्हणाले, सौदी अरेबियाकडून ५६ लाख टन कच्च्या तेलाची खरेदी करण्यासाठी वार्षिक करार करण्यात आला आहे. तसेच अतिरिक्त २ लाख टन कच्च्या तेलाची सौदी अरेबियाकडून खरेदी करण्याचा पर्याय आहे.