नवी दिल्ली– औद्योगिक उत्पादनात जूनमध्ये 16.6 टक्क्यांची घसरण झाली आहे. खाणीसह वीजनिर्मितीमधील घसरण या मुख्य कारणांनी औद्योगिक उत्पादनात घसरण झाल्याचे सरकारी आकडेवारीमधून दिसून आले आहे.
सरकारी आकडेवारीनुसार औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांकामधील आकडेवारीत उत्पादन क्षेत्रात 17.1 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर खाणींमधील उत्पादनात 19.8 टक्क्यांची तर वीजनिर्मितीच्या उत्पादनात 10 टक्क्यांची घसरण झाली आहे.
कोरोनापूर्वीच्या काळाशी वृद्धीदराची तुलना नको-
सांख्यिकी आणि अंमलबजावणी कार्यक्रम मंत्रालयाने औद्योगिक उत्पादनाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. कोरोनाच्या पूर्वीच्या काळातील महिन्यांशी सध्याच्या महिन्यांतील औद्योगिक उत्पादनांची तुलना करणे अयोग्य असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
- औद्योगिक उत्पादनांच्या निर्देशांकात गेल्या तीन महिन्यांत सुधारणा झाली आहे. एप्रिलमध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक हा 53.6, मे महिन्यात 89.5 तर जूनमध्ये 107.8 नोंदविण्यात आला आहे.
- गतवर्षीच्या जूनच्या तुलनेत औद्योगिक उत्पादन निर्देशांक हा चालू वर्षात जूनमध्ये 1.3 टक्क्यांनी वाढला आहे.
- चालू वर्षात एप्रिल-जूनमध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांकात 35.9 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर गतवर्षी एप्रिल-जूनमध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक 3 टक्क्यांनी वाढला होता.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक उद्योग बंद राहिले आहेत. त्याचा फटका उत्पादन क्षेत्रांसह देशातील बाजारपेठेला बसला आहे. टाळेबंदी खुली होवूनही अद्याप उद्योग हे पूर्ण क्षमतेने सुरू झाले नाहीत.