नवी दिल्ली - भारताने चांद्रयान -२ चे आज यशस्वी प्रक्षेपण करत जगाला विज्ञानातील देशाने केलेली प्रगती दाखवून दिली आहे. असे असले तरी देशात संशोधन आणि विकासावर खर्च करण्याचे प्रमाण राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या केवळ ०.७ टक्के आहे. गेली १० वर्षे हीच परिस्थिती कायम राहिल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी लोकसभेत दिली आहे.
संशोधन व विकासावर खर्च करण्यात देश पिछाडीवरच; जीडीपीच्या तुलनेत केवळ ०.७ टक्के खर्च - Ramesh Pokhriyal Nishank
तंत्रज्ञानामध्ये विकसित असलेल्या देशामध्ये खासगी क्षेत्राकडून संशोधन आणि विकासामध्ये ६५ ते ७५ टक्के गुंतवणूक होत असते. मात्र भारतात हे प्रमाण सुमारे ३० टक्के आहे.
केंद्रीय मनुष्यबळ संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी लेखी उत्तरातून 'आर अँड डी'वरील खर्चाची लोकसभेत माहिती दिली. खासगी क्षेत्राकडून संशोधन आणि विकासात ( आर अँड डी) कमी गुंतवणूक होत आहे. त्यामुळे त्यावर कमी खर्च होत असल्याचे कारण निशांक यांनी सांगितले. तंत्रज्ञानामध्ये विकसित असलेल्या देशामध्ये खासगी क्षेत्राकडून संशोधन आणि विकासामध्ये ६५ ते ७५ टक्के गुंतवणूक होत असते. मात्र भारतात हे प्रमाण सुमारे ३० टक्के असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या दहा वर्षापूर्वीच्या तुलनेत संशोधन आणि विकासामधील गुंतवणूक ही तिप्पट झाली आहे. मात्र जीडीपीच्या तुलनेत हे प्रमाण ०.७ टक्के असल्याची त्यांनी माहिती दिली. राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान व्यवस्थापन माहिती व्यवस्थेच्या (एनएसटीएमआयएस) आर अँड डीच्या सांख्यिकी आकडेवारीनुसार ही माहिती लोकसभेत दिली. इस्त्राईलमध्ये ४.३ टक्के, चीनमध्ये २ टक्के तर ब्राझीलमध्ये १.२ टक्के आर अँड डीवर खर्च करण्यात येतात.