नवी दिल्ली – देशाच्या उत्पादन क्षेत्रात सलग चौथ्या महिन्यात जुलैमध्ये घसरण झाली आहे. दीर्घकाळ उद्योग बंद राहिले असताना मागणीही कमी झाल्याने उत्पादन क्षेत्रात घसरण झाली आहे. तसेच खरेदीची प्रक्रिया कमी झाल्याचे पीएमआयच्या सर्वेक्षणात म्हटले आहे.
आएचएस मर्किट इंडियाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जुलैमध्ये भारतीय उत्पादन खरेदी व्यवस्थापन निर्देशांक (पीएमआय) हा 46 राहिला आहे. यापूर्वी जूनमध्ये पीएमआय हा 47.2 होता.
काय आहे पीएमआय?
सगल 32 महिने पीएमआयने वृद्धिदर अनुभवल्यानंतर एप्रिलमध्ये पीएमआय घसरला होता. जर पीएमआय हा 50 हून अधिक असेलत तर उत्पादन वाढल्याचे सूचित होते. तर पीएमआय हा 50 हून कमी असेल तर उत्पादन घसरल्याचे सूचित होते.
आयएचएस मर्किटचे मुख्य अर्थतज्ज्ञ एलियट केर्र म्हणाले, की नुकतेच जाहीर केलेल्या पीएमआय आकडेवारीतून कोरोना महामारीचा देशाच्या आर्थिक स्थितीवर झालेला परिणाम दिसून येतो. या आकडेवारीतून उत्पादन आणि नवीन कार्यादेशांचे सूचकांक घसरल्याचे स्पष्ट होते.
उत्पादनांच्या निर्यातीतही घसरण-
मागणी कमी झाल्याने जूनच्या तुलनेत उत्पादनात किंचित अधिक वेगाने घसरण झाली आहे. टाळेबंदी वाढली असताना काही उद्योग अजून बंद राहिल्याने मागणी कमी झाली आहे. उत्पादनांच्या निर्यातीतही घसरण झाली आहे. कोरोना महामारीचा काळ अनिश्चित आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ग्राहक नवे कार्यादेश देण्यात संकोच करत असल्याचे काही कंपन्यांनी सर्वेक्षणात सांगितले आहे. मागणी कमी होत असताना भारतीय उत्पादकांनी कर्मचाऱ्यांची जुलैमध्येही कपात सुरुच ठेवली आहे.