महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

भारतीय आयटी क्षेत्राला कोरोना विषाणूचा विळखा - कोरोनाचा आयटी क्षेत्रावर परिणाम

भारताच्या आयटी उद्योगातील हे एक अभूतपूर्व संकट आहे. अगोदरच देशाची अर्थव्यवस्था आर्थिक मंदीशी झगडत असताना कोरोनाने या उद्योगाचे कंबरडे मोडले आहे. तरीही या आपत्तीशी लढा देत पुढे जात राहणे हे आयटी कंपन्यांपुढील सर्वात मोठे आव्हान आहे.

आयटी क्षेत्र
आयटी क्षेत्र

By

Published : May 21, 2020, 7:16 AM IST

नवी दिल्ली- सध्या जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे भारताच्या आर्थिक विकासाचा आलेख उंचावणाऱ्या आयटी (माहिती आणि तंत्रज्ञान) उद्योगाला जबरदस्त फटका बसला आहे. ठप्प पडलेल्या व्यवस्थेमुळे उत्पादने आणि सेवा क्षेत्र विस्कळीत झाले आहेत. त्यामुळे भारतातील दीड लाखाहून अधिक लोकांचे रोजगार धोक्यात आले आहेत.

भारताच्या आयटी उद्योगातील हे एक अभूतपूर्व संकट आहे. अगोदरच देशाची अर्थव्यवस्था आर्थिक मंदीशी झगडत असताना कोरोनाने या उद्योगाचे कंबरडे मोडले आहे. तरीही या आपत्तीशी लढा देत पुढे जात राहणे हे आयटी कंपन्यांपुढील सर्वात मोठे आव्हान आहे. आयटी हे एक ज्ञानाधारित औद्योगिक क्षेत्र आहे. मानवी जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी या क्षेत्राने मुख्य हातभार लावला आहे. त्याचबरोबर संघटित, जलद, सुलभ, पारदर्शक आणि समृद्ध असण्याबरोबरच या क्षेत्राने स्टार्टअप क्षेत्रालाही चालना दिली आहे. आधुनिक प्रशासन आणि डिजिटल जगाच्या संकल्पनेची ओळख जगाला करुन देण्यातही या क्षेत्राचा बहुमोल वाटा आहे. जवळपास गेल्या पाच दशकांच्या कालावधीत भारताने आयटी क्षेत्रात स्वतःचे एक भक्कम स्थान निर्माण केले आहे. आपल्या देशाच्या आर्थिक विकासास गती देण्यामध्ये आयटी उद्योगाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या उद्योगाचा देशाच्या एकूण राष्ट्रीय सकल उत्पादनात (जीडीपी) ७.७ टक्के वाटा आहे.

अलीकडच्या काळात भारताने जगाला हेवा वाटावा एवढी प्रगती केली आहे. सध्या भारत जगातील आयटी क्षेत्रातला एक अग्रणी देश आहे. भारताकडे जागतिक आयटी सेवांमधील बाजारातील ५५ टक्के हिस्सा आहे. जगातील सुमारे ८० देशांसाठी भारतातील २०० आयटी कंपन्या कार्यरत आहेत. भारत हा जगाला एकूण ७५ टक्के डिजिटल सेवा प्रदान करतो.

सन २०१८-१९ मध्ये भारताच्या आयटी आणि आयटीईएस उद्योगाची जागतिक बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल १८१ अब्ज डॉलर्स एवढी आहे. यामध्ये १३७ अब्ज डॉलर्स निर्यात मूल्याचा समावेश आहे. सध्या भारतीय आयटी उद्योगाचा हळूहळू विस्तार होत असून परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करीत आहे. २००० ते २०१९ या दरम्यानच्या काळात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात एकूण ४३ अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक झाल्याची नोंद आहे. रोजगाराच्या बाबतीतही या उद्योगाचा विस्तार वाढत आहे.

यामध्ये स्थानिक पातळीवर आयटीमध्ये काम करणाऱ्या भारतीयांची संख्या ४६ लाख एवढी आहे. तर अतिरिक्त २० लाख कर्मचारी हे विदेशी आहेत. गेल्या दोन दशकांपासून रोजगार प्राधान्यक्रमात आयटी क्षेत्र प्रथम क्रमांकावर आहे. या क्षेत्रात करिअरच्या दृष्टीकोनातून प्रगतीच्या संधी आणि आकर्षक सुविधा असल्याने बहुतेक लोक आयटीमध्ये काम करण्याला प्राधान्य देतात.

हेही वाचा- आयटीत यंदा नव्या नोकऱ्या नाहीत; 'या' कर्मचाऱ्यांचे वेतन कपात होण्याची शक्यता

गगनाला भिडणाऱ्या या आयटी उद्योगाला सध्या मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. आर्थिक संकटे, खर्च नियंत्रणावर उपाय, रोबोटिक्स आणि डेटा अ‍ॅनालिटिक्स या सर्वांनी आयटीच्या पडझडीत महत्त्वाची भूमिका निभावली आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदावर निवडून आल्यापासून आयटी क्षेत्रातील बऱ्याच गोष्टी बदलू लागल्या आहेत. त्यांनी घेतलेल्या मोठ्या निर्णयांमुळे भारतातील आयटी तज्ज्ञ आणि नोकरी शोधणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यांच्या एकंदरित गोंधळामुळे कॅम्पस प्लेसमेंट आणि नवीन नोकर्‍या मिळवणे कठीण आणि दूरचे वाटू लागले आहे.

सध्या सर्वत्र कोरोना विषाणूने धुमाकूळ घातल्याने आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनाही नोकरी गमावण्याची भीती वाटू लागली आहे. जगभरातील अनेक देशांनी टाळेबंदीचा मार्ग स्वीकारल्यामुळे आयटी सेवा क्षेत्राची स्थिती अर्धांगवायू झाल्याप्रमाणे झाली आहे. कोरोना संकटामुळे केवळ भारतातच दीड लाख लोकांच्या नोकऱ्या जावू शकतात, असा अंदाज आहे. त्याचबरोबर जसजसे कंपनीला उत्पन्न कमी होत जाईल तसतसे अनेक कर्मचार्‍यांना कामावरून काढले जाईल. सध्या काही कंपन्यांनी वेतन कपातीची घोषणा केली आहे.

हेही वाचा-टाळेबंदीने बेरोजगारीत वाढ; जाणून घ्या, विविध क्षेत्रांवर झालेला परिणाम

काही मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. जवळपास सर्व नवीन प्रकल्प रखडले आहेत. भारतातील जवळपास ७५ टक्के आयटी कंपन्या युरोप आणि अमेरिकेच्या बाजारपेठांवर अंवलंबून आहेत. मात्र या दोन्ही प्रदेशाला सध्या कोरोना विषाणूने प्रचंड ग्रासले आहे. आयटी क्षेत्राला त्वरित पूर्वपदावर आणण्याची शक्यता कमी असल्याने आणखी वाईट अडचणींना सामोरे जावे लागेल. नवीन नोकरभरतीची शक्यता तर दुर्मिळ होऊन बसेल. त्याचबरोबर ग्राहक त्यांचे आगामी प्रकल्प रद्द करण्याची किंवा ते अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याची चिंता या क्षेत्राला लागली आहे.

आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा ही राज्ये आयटी सेवा देण्यामध्ये आघाडीवर आहेत. दरवर्षी आयटी आणि संबंधित अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या दोन राज्यांतील विद्यार्थी जगातील अनेक आघाडीच्या आयटी कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. याच राज्याचे सत्या नडेला हे सध्या मायक्रोसॉफ्ट या नामांकित कंपनीचे सीईओ आहेत. आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा राज्यातील ६ लाख लोक थेट आयटी क्षेत्रात नोकरी करतात. दोन्ही राज्यांतील सरकारे डिजिटल सेवा आणि ई-गव्हर्नन्सला प्राधान्य देणारे आहेत. गुगल, मायक्रोसॉफ्ट, आयबीएम, ओरॅकल आणि अ‍ॅमेझॉन सारख्या जगातील नामांकित कंपन्यांच्या मोठ-मोठ्या शाखा हैदराबादमध्ये आहेत. विजयवाडा आणि विशाखापट्टणमसारख्या शहरांमध्ये आयटी क्षेत्र वेगात आपली पाळेमुळे रोवत आहे.

हेही वाचा-एपीएमसी आत्मनिर्भर भारताला उद्ध्वस्त करतेय? घट्ट करत आहे.

आयटी क्षेत्रावरील ओझे कमी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी आयटी तज्ज्ञ आणि धोरणकर्त्यांचा समावेश असलेल्या विशेष टास्कफोर्सची नियुक्ती करणे आवश्यक आहे. कोणत्याही क्षेत्रात स्थिरतेला अनन्यसाधारण महत्त्व असते. म्हणून अशा कंपन्यांना टिकवून ठेवण्यासाठी सरकारने मदत केली पाहिजे. त्याचबरोबर स्थानिक आयटी कंपन्यांनी गेमिंग, अ‍ॅनिमेशन, इलेक्ट्रॉनिक उत्पादन आणि ग्रामीण तंत्रज्ञान यासारख्या नाविन्यपूर्ण गोष्टींवर लक्ष केंद्रीत करायला हवे.

जेव्हा हा साथीचा रोग समुळ नष्ट होईल तेव्हा अनेक देश चीनमधून आपला व्यवसाय हलवण्याचा विचार करू शकतात. ह्या संधीचे सोने भारताने करावे. त्याचबरोबर ताज्या घडामोडींचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने विद्यमान धोरणांचा आढावा घेऊन त्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे. या संकटकाळात आयटी संस्थांना दिलासा देणे आवश्यक आहे. या संकटामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे फटका बसलेल्या या क्षेत्राला केंद्र सरकारने भरघोस मदत करावी. त्याचबरोबर जमीन, कामगार आणि कर यावर केंद्रित अल्पकालीन आणि दीर्घकालीन धोरणे स्वीकारणे आवश्यक आहे. तसेच एमएसएमई क्षेत्रालाही आर्थिक संकटात मदतीची हमी देणे आवश्यक आहे. सरकारने सावधगिरीने आणि भविष्याचा विचार करुन योग्य ते नियोजन केले तरच खऱ्या अर्थाने भारताच्या आयटी क्षेत्राला पुनरुज्जीवित करता येऊ शकेल.

ABOUT THE AUTHOR

...view details