नवी दिल्ली– कोरोनाच्या रुग्णांच्या संख्या वाढत असतानाही सरकारने आर्थिक चलनवलनावरील निर्बंध कमी केले आहेत. त्यामुळे अनेक उद्योग पुन्हा रुळावर येत आहेत. असे असले तरी चालू आर्थिक वर्षात देशाच्या विकासदरात 9.5 टक्के घसरण होईल, असा इक्रा या पतमानांकन संस्थेने अंदाज व्यक्त केला आहे. देशाची अर्थव्यवस्था खुली होत असताना काही सूचकांकमधून एप्रिल-मेची अत्यंत वाईट अवस्था जूनमध्ये संपल्याचे दिसून आले आहे.
गुंतवणूक माहिती आणि पतमानांकन संस्थेचे (इक्रा) मुख्य अर्थतज्ज्ञ आदिती नायर म्हणाल्या, की एप्रिल 2020 मध्ये कठीण अनुभव घेतल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था सावरण्यास सुरुवात झाली आहे. टाळेबंदीत सर्वात वाईट स्थिती होती. अनेक क्षेत्र हे नव्या सामान्य स्थितीशी जुळवून घेत आहेत.
रोजगार वाढविण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना महामारीच्या काळात वाढविण्याची गरज आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतही विकासदरात (जीडीपी) घसरण होईल, असा अंदाज आहे. अनेक भागात टाळेबंदी लागू होणे व खुली होत असताना कठीण स्थिती आहे. कामगार पुरवठ्यातील तफावत, पुरवठा साखळीवर झालेला परिणाम, उपभोगत्यामधील बदल कायम राहिला आहे. कोरोनाची लस उपलब्ध झाली तर काही क्षेत्रात निश्चित सुधारणा होणार आहेत. त्यामध्ये प्रवास, आदरातिथ्य आणि रिक्रिएशन यांचा समावेश असल्याचे नायर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. कृषी क्षेत्रात आणि ग्रामीण भागातील मागणीबाबत सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.