वॉशिंग्टन - अचानकपणे करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारतातील बिगर बँकिंग अर्थव्यवस्थेत प्रक्षुब्धता आली. यातच जीएसटी आणि निश्चिलनीकरणामुळे याची तीव्रता वाढली. परंतु, ही मंदी नसल्याचे वक्तव्य आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलीना जॉर्जीव्हा यांनी केले आहे.
ही 'मंदीसदृश्य' परिस्थिती; परंतु 'मंदी' नाही - आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक यांनी भारतीय अर्थव्यस्थेत वित्तीय तुटीची जागा कमी असल्याचे सांगितले. परंतु, भारत सरकारच्या नवीन धोरणांमुळे वित्तीय तूट कमी करण्यासाठी मदत होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
भारतीय अर्थव्यवस्थेने 2019 मध्ये आर्थिक अनिश्चितेचा आणि मंदीचा सामना केला. यामुळे आम्हाला मागील वर्षातील वाढीच्या अंदाजानुसार चार टक्क्यांपर्यंत खाली सुधारणा करावी लागली. आम्हाला 2020 मध्ये 5.8 टक्के (वाढीचा दर) आणि त्यानंतर 2021 मध्ये 6.5 टक्क्यांपर्यंतची वाढ अपेक्षित आहे, असे त्या म्हणाल्या.
या मंदीमागील मुख्य कारण बिगर बँकिंग अर्थव्यवस्थेत आलेली अनिश्चितता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भारताने काही महत्त्वपूर्ण सुधारणा हाती घेतल्या आहेत. ज्या दीर्घ काळासाठी देशाला फायदेशीर ठरणार असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. परंतु, याचे काही अल्पकाळ परिणाम समोर येत आहेत.