नवी दिल्ली -कोरोनाच्या काळात लाखो लोकांनी रोजगार गमाविले आहेत. असे असले तरी कोरोनाच्या काळात अब्जाधीशांच्या संपत्तीत ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर २००९ पासून भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत ४२२.९ अब्ज डॉलरने वाढ झाली आहे.
जगभरातील १ हजार अब्जाधीशांनी कोरोनाच्या काळात गमाविलेली संपत्ती केवळ नऊ महिन्यांत मिळविली आहे. मात्र, कोरोना महामारीचा आर्थिक फटका बसलेल्या गरिबांना परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी दहा वर्षांहून अधिक काळ लागणार आहे. ही माहिती जागतिक आर्थिक मंचाच्या दावोस अजेंडाला सुरुवात होत असतानाच ऑक्सफॅमच्या अहवालातून समोर आली आहे. हा अहवाल 'असमानतेचा विषाणू' या नावाने प्रसिद्ध करण्यात आला आहे.
हेही वाचा-केंद्रीय अर्थसंकल्प: जीएसटीत कपात करा; मोबाईल उद्योगाची मागणी
काय म्हटले आहे ऑक्सफॅमच्या अहवालात ?
- जेवढी देशातील ११ अब्जाधीशांची सपंत्ती कोरोनाच्या काळात वाढली आहे, त्या पैशांमध्ये राष्ट्रीय रोजगार हमी योजना १० वर्ष चालू शकते. अथवा आरोग्य मंत्रालयाचे कामकाज १० वर्षांपर्यंत त्या पैशांमधून चालू शकते, असे ऑक्सफॅमने अहवालात म्हटले आहे.
- सरकारने मार्चमध्ये टाळेबंदी लागू केल्यापासून देशातील आघाडीच्या १०० अब्जाधीशांची संपत्ती ही १२.९७ लाख कोटी रुपयांनी वाढली आहे.
- अब्जाधीशांची वाढलेली संपत्ती ही १३.८ कोटी गरिबांना प्रत्येकी ९४,०४५ रुपयांचे धनादेश देण्याएवढी पुरेशी आहे.