नवी दिल्ली– भारत हा मध्यम उत्पन्न गटातील देश म्हणून 2030 पर्यंत स्थान मिळवेल, असा विश्वास नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी व्यक्त केला. ते सीआयआयच्या ऑनलाईन कार्यक्रमात बोलत होते. सध्या, भारताची कमी उत्पन्न गटातील देशांमध्ये गणना होते.
देशाच्या गुंतवणूक साखळीत एप्रिल 2021 मध्य सुधारणा होईल, असे राजीव कुमार यांनी सांगितले. तसेच व्यापारही वाढेल, असे ते म्हणाले. कोरोनाच्या संकटाबाबत राजीव कुमार म्हणाले, की भारताची पश्चिमेकडील देशांबरोबर तुलना करणे योग्य नाही. कारण संसाधने आणि प्राधान्य यामध्ये फरक आहे. जे समाजाच्या तळाशी घटक आहेत, त्यांच्यासाठी आरोग्य आणि समाजकल्याण योजनांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. त्यानंतर उद्योग आणि व्यवसाय, विशेषत: एमएसएमई उद्योगांसाठी चलनाची तरलता वाढविणे यांचा समावेश आहे. सरकार लोकांचे आयुष्य आणि उदरनिर्वाह वाचविण्यासाठी काम करत आहे.