नवी दिल्ली - कोरोनाच्या महामारीत जग चीनकडे तिरस्काराने पाहत आहे. अशावेळी त्या तिरस्कारचे आर्थिक संधीत रुपांतरण करण्याकडे भारताने पहावे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. विदेशातील कंपन्या मोठ्या प्रमाणात भारतात गुंतवणूक करू शकतात, असेही त्यांनी सांगितले. ते विदेशातील विद्यार्थ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलत होते.
चीनमधून बाहेर पडणाऱ्या जपानी कंपन्यांना जपान सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. त्याचा उल्लेख करत नितीन गडकरी म्हणाले, मला वाटते, आपण त्यावर काम विचार करायला पाहिजे. त्यावर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. कंपन्यांना परवानग्या देणार आहोत. विदेशी गुंतवणूक करण्यासाठी आम्ही सर्व काही करणार आहोत. कोरोनाबद्दलची माहिती जगाने लपविली आहे, यावर जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचे दिसून आल्यावर चीनवर भारत कारवाई करणार का, असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर गडकरींनी हा विषय केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय आणि पंतप्रधान यांच्यासंदर्भातील आहे, असे सांगितले. त्यामुळे प्रतिक्रिया देणे योग्य नसल्याचे गडकरींनी स्पष्ट केले.