नवी दिल्ली - व्हेनेझुएलावर अमेरिका आर्थिक निर्बंध घालण्याची शक्यता आहे. यामुळे भारत तेलइंधनाची गरज भागविण्यासाठी ब्राझील आणि मेक्सिकोकडून होणाऱ्या आयातीचे प्रमाण वाढविणार आहे.
सौदी अरेबिया, इराक आणि इराणनंतर व्हेनेझुएला हा भारताचा चौथ्या क्रमाकांचा तेलइंधन पुरवठादार देश आहे. २०१७-२०१८ मध्ये एकूण गरजेच्या ११ टक्के तेलइंधन व्हेनेझुएलामधून आयात करण्यात आले. मात्र, अमेरिका व्हेनेझुएलावर आर्थिक निर्बंध घालण्याची शक्यता असल्याने भारतीय तेलकंपन्यांना इतर पर्याय शोधायला भाग पडले आहे.
ब्राझील आणि मेक्सिकोकडून आयात होणाऱ्या तेल इंधनाचे भारत प्रमाण वाढविणार
२०१७-२०१८ मध्ये एकूण गरजेच्या ११ टक्के तेलइंधन व्हेनेझुएलामधून आयात करण्यात आले. मात्र, अमेरिका व्हेनेझुएलावर आर्थिक निर्बंध घालण्याची शक्यता असल्याने भारतीय तेलकंपन्यांना इतर पर्याय शोधायला भाग पडले आहे.
ब्राझील आणि मेक्सिको भारताला तेलपुरवठा करण्यासाठी उत्सुक-
ब्राझील आणि मेक्सिको या दोन्ही देशांनी उर्जा क्षेत्रातील सहकार्य वाढविण्याची इच्छा दर्शविली आहे. याबाबतच्या पर्यायाचा भारत विचार करत असल्याचे सुत्राने सांगितले. ब्राझील आणि मेक्सिको हे देश आघाडीचे तेल उत्पादक आहेत. जगभरातील तेलउत्पादक देशांमध्ये ब्राझीलचा १० वा क्रमांक आहे. तर मेक्सिकोचा ११ वा क्रमांक आहे. दोन्ही देशांकडून भारत तेलइंधन आयात करत असला तरी २०१३ नंतर हे प्रमाण कमी झाले आहे.
यामुळे व्हेनेझुएलावर येणार आर्थिक निर्बंध-
व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुराओ यांनी पायउतार होण्यासाठी अमेरिकन सरकार दबाव निर्माण करत आहे. त्यासाठी व्हेनेझुएलाच्या तेल निर्यातीवर अमेरिका निर्बंध आणणार आहे. त्याचा फटका व्हेनेझुएलाकडून तेल आयात करणाऱ्या देशांनाही होणार आहे.
व्हेनेझुएलामधून रिलायन्स इंडस्ट्रीज आणि नयारा एनर्जी (पूर्वीचे एस्सार ऑईल) या कंपन्यांनी तेलइंधनाच्या आयातीचे प्रमाण कमी केले आहे. व्हेनेझुएलामधून भारतामध्ये होणाऱ्या एकूण आयातीच्या ८० टक्के तेलइंधन रिलायन्स इंडस्ट्रीज आयात करते. हे प्रमाण २०१८ मध्ये प्रती दिवशी २ लाख ७० हजार बॅरल एवढे होते. मात्र, हे प्रमाण रिलायन्स इंडस्ट्रीजने कमी केले आहे.