नवी दिल्ली- जागतिक बँकेच्या २०२० च्या उद्योगानुकलतेच्या यादीत (इज ऑफ डुइंग बिझनेस) भारताची १४ अंकांनी सुधारणा झाली आहे. या यादीत भारताने ७७ व्या क्रमांकावरून ६३ क्रमांकावर झेप घेतली आहे.
जागतिक बँकेने १९० देशांच्या उद्योगानुकलतेची यादी आज जाहीर केली. उद्योगानुकलतेमध्ये सुधारणा करणाऱ्या सर्वप्रथम १० देशांच्या यादीत भारताने सलग तिसऱ्यांदा स्थान पटकावले आहे. नवी दिल्लीत उद्योगानुकलतेमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचे जागतिक बँकेने सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे.
जागतिक बँकेने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मेक इन इंडिया'च्या उपक्रमाचे कौतुक केले. या मोहिमेमुळे विदेशी गुंतवणूक आकर्षित होत असल्याचे बँकेने म्हटले आहे. खासगी क्षेत्र विशेषत: उत्पादन क्षेत्राला चालना मिळाल्याने देशाच्या सर्वच क्षेत्रात स्पर्धात्मकता वाढली आहे.