नवी दिल्ली - देश प्रचंड अशा मंदीला सामोरे जात आहे. तर अर्थव्यवस्था ही बँकांवरील संकटाने अतिदक्षता विभागाकडे जात असल्याचा इशारा देशाचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी दिला. अशी माहिती देणारे पेपर त्यांनी हॉवर्ड विद्यापीठाच्या जागतिक विकास केंद्रासाठी लिहिली आहेत.
सुब्रमण्यम हे मोदी सरकारमधील पहिले मुख्य आर्थिक सल्लागार होते. त्यांनी गतवर्षी ऑगस्टमध्ये राजीनामा दिला होता. त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या भारतीय कार्यालयाचे माजी प्रमुख जॉश फेलमॅन यांच्याबरोबर पेपर प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेवर चार क्षेत्राच्या ताळेबंदामुळे (फोर बॅलन्स शीट) मोठ्या प्रमाणात विपरित परिणाम होत असल्याचे पेपरमध्ये म्हटले आहे.
पेपरमध्ये सुब्रमण्यम यांनी म्हटले, स्पष्टपणे सांगायचे झाले तर ही सामान्य मंदी नाही. ही भारतात असणारी प्रचंड मंदी आहे. देशाच्या दीर्घकाळाच्या विकासात योगदान देणारी गुंतवणूक आणि निर्यातीचे प्रमाण जागतिक आर्थिक संकट आल्यापासून कमी झाले आहे. याशिवाय विकासाचे इंजिन असलेले मागणी (कन्झम्पशन) हेदेखील थांबले आहे. त्यामुळे गेल्या काही तिमाहीत राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा विकासदर घसरला आहे.