हैदराबाद - चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील देशाच्या सकल उत्पन्नाची (जीडीपी) आकडेवारी सोमवारी (३१ ऑगस्ट) केंद्रीय सांख्यिकी कार्यालय जाहीर करणार आहे. यामध्ये पहिल्या तिमाहीचा विकासदर हा १९७९ नंतर सर्वाधिक घसरणार असल्याचा अंदाज आहे.
कोरोना महामारीत आर्थिक विकासदराची पहिल्यांदाच संपूर्ण आकडेवारी सोमवारी जाहीर होणार आहे. त्यामधून कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर किती परिणाम झाला, हे समजू शकणार आहे. विविध बँका आणि संस्थांच्या मत देशाचा जीडीपी हा चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत किमान १५ ते २० टक्के घसरणार आहे. ही १९७९ नंतरची तिमाहीच्या विकासदरामधील सर्वाधिक मोठी घसरण असणार आहे. देशाचा विकासदर १९७९ मध्ये उणे ५.२ टक्के झाला होता.
हेही वाचा-आर्थिक सुधारणांचे 'हरित कोंब' फार थोड्या कालावधीसाठी टिकणार
कोरोना महामारीपूर्वी आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये जानेवारी ते मार्च तिमाहीत विकासदर हा ३.१ टक्के होता. तर संपूर्ण आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये विकासदर हा त्यामागील ११ वर्षात सर्वात कमी ४.२ टक्के राहिला होता. कोरोना महामारीमुळे देशात २५ मार्च २०२० ला टाळेबंदी लागू केल्यानंतर देशातील अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट झाली आहे.