वॉशिंग्टन - कोरोना महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्था आर्थिक जाळ्यात सापडल्याचे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी व्यक्त केले आहे. त्यावर मात करण्यासाठी धोरणकर्त्यांनी अधिक आर्थिक प्रोत्साहन द्यावी, अशी गोपीनाथ यांनी व्यक्त केली आहे.
आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी एका माध्यमात लेख लिहून जागतिक अर्थव्यवस्थेवर मत व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले, की जगात पहिल्यांदाच एकूण अर्थव्यवस्थेपैकी ६० टक्के अर्थव्यवस्थांनी व्याजदर हा १ टक्क्यांहून कमी केला आहे. त्यामध्ये ९७ टक्के प्रगत अर्थव्यवस्था आहेत. अजून अर्थव्यवस्थांना धक्का बसला तर मध्यवर्ती बँकांना आणखी व्याजदर कपात करण्याची कमी संधी आहे. त्यामुळे आपण जागतिक आर्थिक सापळ्यात अडकलो आहोत, या निष्कर्षापासून पळू शकत नाहीत. यावर मात करण्यासाठी योग्य धोरण असले पाहिजे, याबाबत आपण सहमत असले पाहिजे.