नवी दिल्ली - केंद्र सरकार १६ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांना ६ हजार कोटी रुपये जीएसटी मोबदलापोटी वितरीत करण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. यामध्ये महाराष्ट्र, बिहार, आसाम, पदुच्चेरी आणि दिल्लीचा समावेश आहे.
केंद्र सरकार जीएसटी मोबदलाच्या दुसऱ्या टप्प्यात पदुच्चेरीलाही निधी देणार आहे. केंद्र सरकारने यापूर्वी २३ ऑक्टोबरला १६ राज्यांसह दिल्ली आणि जम्मू आणि काश्मीरला ६ हजार कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. जीएसटी मोबदलाचे संकलन कमी झाले असताना केंद्र सरकारकडून विशेष खिडकीद्वारे ६ हजार कोटी रुपये देण्यात येत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. ही देण्यात येणारी मदत वार्षिक व्याज दर ४.४२ टक्क्यांनी असेल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
केंद्रीय अर्थमंत्रालयाने विशेष खिडकी योजनेतून १२ हजार कोटींच्या कर्जाची सुविधाही दिली आहे. देशातील २१ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी विशेष खिडकी योजनेतून कर्ज स्वीकारण्याचा पर्याय निवडला आहे.