नवी दिल्ली- देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक बातमी आहे. सलग दुसऱ्या महिन्यात वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संकलन हे १ लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. जीएसटी संकलन नोव्हेंबरमध्ये १.०४ लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. ऑक्टोबरमध्ये जीएसटीचे संकलन हे १.०५ लाख कोटी रुपयांहून अधिक होते, असे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.
जीएसटीचे नोव्हेंबर २०२० मधील संकलन हे नोव्हेंबर २०१९ च्या तुलनेत १.४ टक्के जास्त आहे. जीएसटीच्या संकलनात सुधारणा होत आहे. नोव्हेंबरमध्ये आयात वस्तुंवरील शुल्कातून मिळणारे महसुलाचे प्रमाण गतवर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत ४.९ टक्क्यांनी जास्त असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.
हेही वाचा-बेकायदेशीर सिगरेटच्या उत्पादनातून १२९ कोटी रुपयांची करचुकवेगिरी; मुख्य सुत्रधाराला अटक
नोव्हेंबरमध्ये असे राहिले जीएसटीचे संकलन
- एकूण जीएसटी संकलन-१,०४,९६३ कोटी रुपये
- केंद्रीय जीएसटी - १९,१८९ कोटी रुपये
- राज्य जीएसटी - २५,५४० कोटी रुपये
- आयजीएसटी -५१,९९२ कोटी रुपये (आयातीचे २२,०७८ कोटी रुपये)
- उपकर -८,२४२ कोटी रुपये (आयातीचे ८०९ कोटी रुपये)