नवी दिल्ली - देशात कांद्याचे भाव १०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचल्या आहेत. या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने १ लाख टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतल्याचे रामविलास पासवान यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या मालकीची एमएमटीसी ही संस्था देशात कांदा आयात करणार आहे. तर सहकारी संस्था नाफेड कांद्याचा देशातील बाजारपेठेत पुरवठा करणार आहे. हा निर्णय केंद्रीय सचिवांच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला आहे. याबाबत माहिती देणारे ट्विट केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी केले आहे.
केंद्र सरकारने एमएमटीसीला कांदे आयात करण्याची सूचना दिली आहे. हा आयात केलेला कांदा १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यत बाजारपेठेत वितरणासाठी उपलब्ध व्हावा, अशी सूचना एमएमटीसीला करण्यात आली आहे. तर नाफेडलाही कांद्याचे वितरण देशभरात करण्याची सूचना दिल्याचे रामविलास पासवान यांनी म्हटले आहे.
देशभरात कांद्याचा पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. त्याचा परिणाम म्हणून देशभरातील बाजारपेठेतील कांद्याची आवक घटली आहे. आवक घटल्याने कांद्याच्या किमती दिल्लीत १०० रुपये तर देशाच्या इतर भागात ६० ते ८० रुपयापर्यंत पोहोचल्या आहेत.