नवी दिल्ली - घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणखी नव्या आर्थिक सुधारणा जाहीर होणार आहेत. आर्थिक सुधारणांवर सरकार काम करत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. त्या 'एचटी लिडरशीप समिट' कार्यक्रमात बोलत होत्या.
अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान विविध सुधारणांची पावले उचलल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, सरकारी बँकांनी सुमारे ५ लाख कोटी कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. मागणीला चालना देण्यासाठी मार्ग आहेत. प्रत्यक्ष मार्गांचा आम्ही अवलंब केला आहे. त्याशिवाय पायाभूत सुविधांवर खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे मुख्य क्षेत्रांना फायदा होईल. आर्थिक चलनवलनासाठी (अॅक्टिव्हिटी) आणखी सुधारणा घोषित करण्यात येणार आहेत का? असे विचारले असता त्यांनी सरकार त्यावर काम करत असल्याचे सांगितले. वस्तू आणि सेवा कराबाबत (जीएसटी) जीएसटी परिषदेला निर्णय घ्यावा लागणार असल्याचे त्यांनी म्हटले.