नवी दिल्ली - सांख्यिकी संस्थांची विश्वासर्हता टिकविण्यासाठी केंद्र सरकार बांधील असल्याचे केंद्रातील वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सांख्यिकी संस्थांमधील आकडेवारीबाबत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे आरोप वरीष्ठ अधिकाऱ्याने फेटाळून लावले आहेत. तर राष्ट्रीय नमुने सर्व्हे कार्यालयाकडून रोजगारीची आकडेवारी मार्चअखेर जाहीर होणार असल्याची माहिती दिली आहे.
गेल्या आठवड्यात १०८ अर्थतज्ज्ञ आणि सामाजिक शास्त्रज्ञांनी सांख्यिकी आकडेवारीत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला होता. सांख्यिकी संस्थांसह सरकारी संस्थांचे स्वातंत्र्य जपावे, अशी त्यांनी मागणी केली होती. केंद्र सरकार सांख्यिकी संस्थांची विश्वासर्हता जपण्यासाठी बांधील आहे. एवढेच नव्हेतर या संस्थांची बळकटीकरण करत आहे व पुढेही करत राहणार असल्याचे अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.