नवी दिल्ली- केंद्र सरकारने आरबीआयच्या पतधोरण समितीवर तीन अर्थतज्ज्ञांची निवड केली आहे. यामध्ये आशिमा गोयल, जयंत आर. वर्मा आणि शशांक भिडे यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निवड समितीचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पतधोरण समितीच्या नावांना अंतिम मंजुरी दिली आहे.
नव्या आरबीआय कायद्यानुसार पतधोरण समितीच्या तीन नवीन सदस्यांची चार वर्षांची मुदत असणार आहे. पतधोरण समितीवरील सदस्यांची निवड अजून न झाल्याने पतधोरण समितीची नियोजित बैठक पुढे ढकलण्यात आली होती. ही बैठक २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२० दरम्यान होणे अपेक्षित होते. आता समितीच्या सदस्यांची निवड झाल्यानंतर ७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान पतधोरण समितीची बैठक घेण्यात येणार असल्याचे आरबीआयने जाहीर केले आहे. आरबीआयकडून ९ ऑक्टोबरला रेपो दर आणि रिर्व्हर्स रेपो दर जाहीर करण्यात येणार आहे.