नवी दिल्ली- कोरोनाच्या संकटात स्थावर मालमत्ता क्षेत्र आर्थिक मंदीतून जात असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलासादायक घोषणा केली आहे. गृह विक्रीला चालना देण्यासाठी २ कोटीपर्यंतच्या गृह खरेदीवर प्राप्तिकरात सवलत दिली जाणार असल्याचे सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सध्या सर्कल रेट आणि करार व्हॅल्युमध्ये केवळ १० टक्के फरक आहे. स्थावर मालमत्ता क्षेत्राला चालना देण्यासाठी हा फरक वाढवून ३० जून २०२१ पर्यंत २० टक्के करण्यात येणार आहे. मात्र, केवळ २ कोटी रुपयापर्यंतच्या घरासाठी हा नियम लागू होणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. घरांच्या खरेदीवर ग्राहकांना प्राप्तिकर द्यावा लागतो. प्राप्तिकर कायद्यात बदल करून प्राप्तिकरात सवलत दिली जाणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे गृहखरेदी करणारे व बांधकाम विकासकांना फायदा मिळेल, असे सीतारामन यांनी सांगितले. गृहखरेदीला चालना मिळाल्याने रोजगार वाढेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.