नवी दिल्ली- कोरोनाने जगभरात महामारीचे रूप धारण केले तर जागतिक मंदी येण्याची शक्यता आहे. कोरोनाचा संसर्ग इटली आणि कोरियामध्ये वाढत असताना मूडीज अॅनालिटिक्सने जागतिक मंदीबाबत अंदाज व्यक्त केला आहे.
कोरोना विषाणूने चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. आता, जागतिक अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाल्याचे मूडीज अॅनालिटिक्सचे मुख्य अर्थतज्ज्ञ मार्क झंडी यांनी म्हटले आहे.
चीनमधील वुहानमध्ये प्रथम आढळलेल्या कोरोना विषाणूला कोव्हिड-१९ असे नाव देण्यात आले आहे. या कोव्हिड-१९ मुळे हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचे जागतिक अर्थव्यवस्थेला आव्हान-
कोव्हिड-१९ हा जागतिक अर्थव्यवस्थेचा विविध मार्गांनी लढा आहे. चीनचा प्रवास आणि पर्यटन व्यवसाय थांबला आहे. जागतिक विमान कंपन्या चीनमध्ये जाण्यासाठी तयार नाहीत. तर आशिया-प्रशांत महासागर क्षेत्रात जहाजे जाण्यासाठी नकार देत आहेत. चीनचे ३० लाख पर्यटक हे अमेरिकेला दरवर्षी भेट देतात, असे मूडीजच्या अॅनालिटिक्समध्ये म्हटले आहे.
अमेरिकेसह इतर जागतिक प्रवासामध्ये मोठा अडथळा निर्माण झाला आहे. विदेशी पर्यटकांमध्ये चीनचे पर्यटक सर्वाधिक अमेरिकेमध्ये पैसे खर्च करतात. युरोपमधील प्रवासावरही परिणाम झाला आहे. महत्त्वाचे प्रवासी केंद्र असलेले इटलीमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
चीनमधील कारखाने बंद पडल्याने भारतासह अनेक देशांना सुट्या भागांचा पुरवठा होण्यात अडथळा निर्माण झाला आहे. चीनमधील उत्पादक कारखान्यांची पुरवठा साखळी विसकळीत झाली आहे. यामध्ये अॅपल, नाईक आणि जनरल मोटर्स या अमेरिकन कंपन्यांचा समावेश आहे.