नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून मोफत लसीकरण आणि गरिबांना धान्य देण्यासाठी अतिरिक्त १.४५ लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे सूत्राने सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेला दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत कोरोना लसीकरण आणि दिवाळीपर्यंत गरिबांना धान्यवाटपाची घोषणा सोमवारी केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ वर्षांहून अधिक वयोगटासाठी कोरोना लस खरेदी करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे केंद्र सरकारला लसीकरणासाठी ४५ हजार ते ५० हजार कोटी रुपये खर्च करावे लागणार आहे. प्रत्यक्षात, अर्थसंकल्पात लसीकरणासाठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती.
हेही वाचा-प्राप्तिकर विभागाचे नवीन ई-फायलिंग पोर्टल लाँच; 'या' मिळणार सुविधा
- देशात ८० कोटी गरिबांना दिवाळीपर्यंत ५ किलो गहू किंवा तांदूळ आणि ५ किलो डाळी दर महिन्याला देण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारला १.१ लाख कोटी आणि १.३ लाख कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. अशा रीतीने केंद्र सरकारला कोरोनाच्या काळात अतिरिक्त १.४५ लाख कोटी रुपये अतिरिक्त खर्च करावे लागणार आहेत.
- केंद्र सरकार लसीकरणाच्या बदललेल्या धोरणानुसार २१ जूनपासून सर्व प्रौढांना मोफत लस देणार आहे. तर गरिबांना जूनपासून नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य देणार आहे.