नवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष असणारा केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेमध्ये सादर होणार आहे. भारतीय स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्पाची छपाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे केंद्रीय अर्थमंत्री कोणत्या रंगाच्या ब्रीफकेसमध्ये अर्थसंकल्प आणणार आहेत, याबाबत औत्सुक्य दिसून येणार नाही.
दरवर्षी हलवा समारंभानंतर अर्थसकंल्प हा छपाईसाठी रवाना होता. मात्र, कोरोना महामारीमुळे यंदा अर्थसंकल्पाची छपाई करण्यात आलेली नाही. अर्थसंकल्पाची माहिती सर्वसामान्यांना मिळण्यासाठी युनियन बजेट मोबाईल अॅप लाँच होणार आहे. अर्थसंकल्पाबाबतची १४ महत्त्वाची कागदपत्रे व माहिती ही अॅपमधून समजू शकणार आहेत.
संबंधित बातमी वाचा-अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर होणार महत्त्वाची 20 आर्थिक विधेयके
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २९ जानेवारीला लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला आहे. आर्थिक सर्वेक्षण अहवालाचीही छपाई करण्यात आलेली नाही. आर्थिक सर्वेक्षणाबाबतचे अॅप लाँच करण्यात आले आहे. या अॅपवर आर्थिक सर्वेक्षणाची इत्यंभूत माहिती देण्यात आलेली नाही.
महत्त्वाची आर्थिक विधेयके होणार सादर
केंद्रीय संसद व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ३८ विधेयक सादर करणार असल्याने शनिवारी सांगितले आहे. केंद्र सरकार सुधारणांचा कार्यक्रम सुरू होण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात महत्त्वाची आर्थिक विधेयके सादर करण्यावर भर देणार आहे. या अधिवेशनात महत्त्वाची २० आर्थिक विधेयके सादर होणार आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे भाषण साधारणत: सकाळी अकरा वाजता सुरू होणार आहे. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांची टीम आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यासोबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अर्थमंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची सकाळी १० वाजून १५ मिनिटाला बैठक होणार आहे. अर्थसंकल्पाचे सादरीकरण हे साधारणत: ९० ते १२० मिनिटांचे असणार आहे
अर्थसंकल्प सादर करण्याच्या वेळी आणण्यात येणाऱ्या ब्रिफकेसचा एक निराळाच इतिहास आहे. आजवर, वेळोवेळी या ब्रिफकेसचा आकार, संरचना (डिझाईन ) आणि रंग बदलत गेला आहे. अर्थसंकल्प सादर करताना कधी लाल तर कधी काळा तर कधी तपकिरी रंगाच्या सुटकेस आजवर दिसून आल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये विविध केंद्रीय अर्थमंत्र्यांनी वेगवेगळ्या रंगाच्या ब्रिफकेसचा वापर केला आहे. वित्त मंत्रालय केंद्रीय अर्थमंत्र्यांना तीन ते चार बॅगचा पर्याय देत असते. यामध्ये त्यांच्या निवडीनुसार बॅगची निवड करण्यात येत होती. मात्र, यंदा अर्थसंकल्प डिजीटल स्वरुपात असणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ब्रिफकेसचा असा आहे रंजक इतिहास
-स्वातंत्र्यानंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या रंगाच्या ब्रिफकेसचा केला वापर-
- भारताचे पहिले केंद्रीय अर्थमंत्री आर.के.षणमुखम चेट्टी यांनी १९४७ ला पहिला अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी त्यांनी अर्थसंकल्पाशी संबंधित कागदपत्रे कातडी बॅगेत ठेवली होती.
- १९५६ ते १९५८ आणि १९६४ ते १९६६ दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री राहिलेल्या टी.टी. कृष्णमाचारी यांनी फाईल बॅगेमधून अर्थसंकल्पाची कागदपत्रे नेली होती.
- देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९५८ मध्ये काळ्या रंगाच्या ब्रिफकेसचा वापर केला होता.
- १९७० नंतर देशाच्या अर्थमंत्र्यांनी क्लासिक हार्डटॉपच्या ब्रिफकेसचा वापर सुरू केला आहे. अटल बिहारी वाजपेयी सरकार यांच्या कार्यकाळात यशवंत सिन्हा यांनी आणलेली ब्रिफकेसला पट्टे होती. अशी ब्रिफकेस ही ब्रिटनच्या चान्सेलर यांच्याकडे होती.
- माजी पंतप्रधान आणि केंद्रीय अर्थमंत्री मनमोहस सिंग यांनी वापरलेली ब्रिफकेस ही ब्रिटनचे माजी चॅन्सलर विल्यम एवर्ट ग्लॅडस्टोन यांच्या ब्रिफकेससारखी होती.
- राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या काळात केंद्रीय अर्थमंत्री असताना पी.चिदंबरम यांनी साध्या तपकिरी आणि लाल रंगाच्या ब्रिफकेसचा वापर केला होता.
- मोदी सरकारमध्ये असताना अरुण जेटली यांनी २०१४ मध्ये तपकिरी रंगाच्या ब्रिफकेसचा वापर केला. तर दुसऱ्या वर्षी व २०१७ मध्ये गडद तपकिरी रंगाच्या ब्रिफकेसमधून त्यांनी अर्थसंकल्पाची कागदपत्रे संसदेत आणली होती.
- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना पीयूष गोयल यांनी लाल रंगाच्या ब्रिफकेसचा वापर केला होता.
- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ५ जुलै २०१९ ला लाल रंगाच्या कापडामध्ये अर्थसंकल्पाची कागदपत्रे आणून ब्रिफकेसची परंपरा मोडीत काढली. लाल रंगाच्या कापडात म्हणजे चोपडीत खातेवही ठेवण्याची परंपरा असल्याचे देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णुर्ती सुब्रमण्यन यांनी सांगितले होते.
संबंधित बातमी वाचा-जाणून घ्या, देशाच्या अर्थसंकल्पासमोरील आव्हाने
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पहिले सत्र १५ फेब्रुवारीऐवजी १३ फेब्रुवारीला संपण्याची शक्यता असल्याचे सूत्राने सांगितले आहे. असे असले तरी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा कार्यकाळ तेवढाच राहणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन हे ८ एप्रिलला संपणार आहे. सुत्राच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ५ फेब्रुवारीला विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत.