नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. चालू आर्थिक वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर (जीडीपी) हा जवळपास शून्य राहिल, असा त्यांनी अंदाज केला आहे. त्या भारत उर्जाचा मंच असलेल्या 'सेरावीक' कार्यक्रमात बोलत होत्या.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) विकासदरात २३.९ टक्के घसरण झाली आहे. त्यामुळे मुख्यत: अर्थव्यवस्थेच्या विकासदरावर परिणाम झाल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. पुढे सीतारामन म्हणाल्या, की देशात २५ मार्चपासून अत्यंत ठामपणे टाळेबंदी लागू करण्यात आली. टाळेबंदीमुळे कोरोना महामारीशी लढण्याकरता पुरेसा वेळ मिळाला.
विकासदर वाढण्याची आशा-
केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, की टाळेबंदी खुली होताना अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याचे संकेत दिसत आहेत. सणांच्या दरम्यान अर्थव्यवस्थेला आणखी चालना मिळणार आहे. दुसऱ्या व चौथ्या तिमाहीत विकासदरात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. पुढील आर्थिक वर्षात विकासदराला आणखी चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले. सार्वजनिक खर्च करून अर्थव्यवस्थेतील चलनवलनाला प्रोत्साहन देण्यावर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केल्याचेही त्यांनी सांगितले.
देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती अत्यंत वाईट-
देशाच्या सकल उत्पादनात (जीडीपी) चालू आर्थिक वर्षात ९.६ टक्क्यांची घसरण होईल, असा जागतिक बँकेने नुकतेच अंदाज व्यक्त केला आहे. कोरोना महामारीत देशभरात लागू केलेली टाळेबंदी आणि उत्पन्न कमी झाल्याचा कुटुंबांसह कंपन्यांना धक्का बसला आहे. भारताची अर्थव्यवस्था कधी नव्हे अशी अत्यंत वाईट झाल्याचे जागतिक बँकेने अहवालात म्हटले आहे.