नवी दिल्ली - कोरोना महामारी व देशाची अर्थव्यवस्था संकटातून जात असताना केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची घोषणा केली आहे. या योजनेतून रोजगार वाढविण्यासाठी गृहखरेदी, १ हजारांहून अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्यांसाठी सवलत, पंतप्रधान शहर आवास योजनेकरता अतिरिक्त निधी आदी १२ घोषणा करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्था सावरत असल्याचे विविध आकडेवारीतून समोर आल्याचे म्हटले आहे. कोरोना काळात घोषित केलेल्या आर्थिक पॅकेजच्या अंमलबाजवणीची आकडेवारी सीतारामन व केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. त्यानंतर रोजगार वाढविण्यासाठी १२ घोषणा केल्या आहेत.
- कोरोनावरील लसीसाठी जैवतंत्रज्ञान विभागाला संशोधन व विकासासाठी ९०० कोटी रुपये स्वतंत्रपणे देण्यात येणार आहेत.
- देशातील उद्योग विशेषत: संरक्षण क्षेत्राला चालना देण्याकरता १० हजार २०० कोटींचे भांडवल देण्यात येणार आहे.
- शेतकऱ्यांना मुबलक खत पुरवठा होण्यासाठी ६५ हजार कोटींचे अनुदान देण्यात येत आहे. या निधीमुळे आगामी हंगामात शेतकऱ्यांना खतांचा पुरेसा पुरवठा होईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला.
-
निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी निर्यात बँकेला (एक्सिम बँक) ३ हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
-
ग्रामीण भागात रोजगार वाढविण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण रोजगार योजनेत अतिरिक्त १० हजार कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.
-
केंद्र सरकार राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत निधीत (एनआयआयएफ) ६ हजार कोटींची शेअरच्या स्वरुपात गुंतवणूक करणार आहे. यामधून एनआयआयएफला २०२५ पर्यंत पायाभूत प्रकल्पांसाठी १.१ लाख कोटी रुपये जमविणे शक्य होणार आहे.
-
गृहखरेदीला प्रोत्साहन मिळण्याकरता प्राप्तिकर कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. त्यामुळे गृहखरेदी करणारे व बांधकाम विकासकांना फायदा मिळेल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
-
पंतप्रधान शहर आवास योजनेत अतिरिक्त १८ हजार कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. ही अर्थसंकल्पाहून ८ हजार कोटींची अधिक तरतूद असणार आहे. त्यामधून ७८ लाख रोजगार निर्मिती होईल, अशी अपेक्षा आहे. तसेच स्टील आणि सिमेंटच्या उद्योगाला चालना मिळेल, अशी अर्थमंत्र्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.
-
ईसीएलजीएस २. ० योनजेत २६ क्षेत्रांना टक्के कर्जहमी देणारे विनातारण कर्ज देण्यात येणार आहे. ही २६ क्षेत्रे कामत समितीने सूचविलेली आहेत.
- उत्पादनावर आधारित १० चॅम्पियन क्षेत्रांना १.४६ कोटींची सवलत देण्यात येणार आहे. यापूर्वी केवळ ३ क्षेत्रांना उत्पादनावर आधारित कर्ज देण्यात येणार आहे.
-
कोरोना महामारीत रोजगार वाढण्यासाठी आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ही योजना १ ऑक्टोबर २०२० ते पुढील दोन वर्षासाठी लागू होणार आहे. इसीएलजी योनजेला ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या कंपन्यांमध्ये १ हजारांहून अधिक कर्मचारी आहेत, त्यांना भरावा लागणारा १२ टक्के ईपीएफ केंद्र सरकार दोन वर्षे भरणार आहे. रोजगार गेलेल्या व्यक्तींना कंपन्यांनी नोकरी दिली तर त्यांना सरकारकडून सवलत दिली जाणार आहे.
- कर्जाच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
- विदेशी चलनात वाढ झाली आहे.
- थेट विदेशी गुंतवणूकीत वाढ झाली आहे.
- कंपन्यांच्या भांडवली मूल्यात वाढ झाली आहे.
- गेल्या १५ ते २० दिवसात निश्चित अर्थव्यवस्था सावरत आहे.
- ग्राहक किंमत निर्देशांकात सुधारणा होत आहे.
- तसेच उर्जेची मागणी आणि जीएसटी संकलनात सुधारणा झाली आहे.
- ६८ कोटी जनतेला मोफत रेशन धान्याचे वितरण करण्यात आले.
- २६ कोटी फेरीवाल्यांचे अर्ज आले आहेत.
- स्थलांतरित मजुरांसाठी पोर्ट सुरू केले आहे.
- रस्त्यावरील फेरीवाल्यांसाठी एकूण १ हजार ३७३ कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.
- एक देश- एक रेशन कार्ड या योजनेतून २८ राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये १ सप्टेंबरपासून योजना राबविण्यात येत आहे.
- ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलनाने १.०५ लाख कोटींचा ओलांडला टप्पा ओलांडला आहे.
- रब्बीच्या हंगामासाठी अतिरिक्त २५ हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे.
- किसान क्रेडिट कार्डचा कोट्यवधी शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.
-
पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेसाठी २१ राज्यांनी प्रस्ताव पाठविले आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने १ हजार ६८१ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
देशाचा मूड बदलत आहे-
मूडीज पतमानांकन संस्थेने चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचा विकासदर ८.९ टक्क्यांनी घसरणार असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी मूडीजने ९.६ टक्क्यांनी विकासदर घसऱणार असल्याचे म्हटले आहे. तर पुढील आर्थिक वर्षात विकासदर हा ८.६ टक्के राहिल, असा मूडीजने अंदाज केला आहे. यापूर्वी मूडीजने पुढील आर्थिक वर्षात ८.१ टक्के विकासदर राहिल असे म्हटले होते. या आकडेवारीचा संदर्भ देत अनुराग ठाकूर यांनी देशाचा मूड (मन:स्थिती) बदलत असल्याचे सांगितले आहे.