नवी दिल्ली -अर्थसंकल्पावर विरोधी पक्षांकडून चुकीचे कथन केले जात असल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत केला. त्या अर्थसंकल्पावरील चर्चासत्रात बोलत होत्या. अर्थसंकल्पामध्ये गरिबांसाठी मोफत धान्यांसह विविध योजनांसाठी तरतूद केल्याची त्यांनी माहिती दिली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, कोरोना महामारीच्या काळात अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. अशा स्थितीत आत्मनिर्भर भारतासाठी अर्थसंकल्प हे महत्त्वाचे साधन आहे. अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यामधून कमी काळात उपाययोजना होणार आहे. तसेच गरजुंना तातडीने लाभ होणार आहे.
हेही वाचा-सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ
देशाचा अर्थव्यवस्थेचा विकासदर उंचावण्यासाठी अर्थसंकल्पात उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे देश सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा-शेअर बाजार निर्देशांक किंचित वधारला; आयसीआयसीआयच्या शेअरमध्ये तेजी
राहुल गांधींनी केली होती लोकसभेत टीका-
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांवर टीका केली. हा देश फक्त चार लोक चालवत असल्याचे ते म्हणाले. बाजार समित्या बंद करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायद्यांच्या हेतूबद्दल बोला असे म्हणत होते, मात्र त्यांचा हेतू फक्त आपल्या मित्रांची मदत करणे आहे, असे राहुल गांधी म्हणाले. काही वर्षांपूर्वी ‘हम दो हमारे दो’ घोषणा देण्यात आली होती. कोरोना ज्याप्रमाणे दुसऱ्या रुपात आला आहे, तसेच ही घोषणा आली आहे. हा देश चार लोक चालवतात ‘हम दो और हमारे दो’,” ते चार लोक कोण आहेत ते तुम्ही समजून घ्या, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. या कायद्यांमुळे भूक, बेरोजगारी आणि आत्महत्या हे तीन पर्याय आपण दिले आहेत असेही ते म्हणाले.
अर्थसंकल्पावर पी. चिदंबरम यांनीही केली होती टीका-
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चासत्रात केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. आर्थिक वर्ष २०२१-२१ साठी अर्थसंकल्पातील प्रस्तावित तरतुदींमध्ये गरीब, बेरोजगार आणि एमएसएमई क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पी. चिदंबरम यांनी केला होता.