नवी दिल्ली - मंदीमधून जात असलेल्या वाहन उद्योगाने जीएसटी कमी करण्याची मागणी केली आहे. वाहनांवरील जीएसटी कमी करण्याबाबत केंद्रीय वित्तीय मंत्रालयाची राज्य सरकारांबरोबर चर्चा सुरू असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ते हिरो मोटरसायकल आणि अॅक्टिव्हाच्या नव्या बीएस-६ मॉडेलच्या लाँचिग कार्यक्रमात बोलत होते.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, एसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी वाहनांवरील जीएसटीबाबतची सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्यांबरोबर वित्तीय मंत्रालयाने चर्चा केल्यानंतर जीएसटी कमी करण्याबाबत विचार केला जाईल, असे नितीन गडकरी म्हणाले. असे असले तरी, वाहनांवरील जीएसटी कमी करण्याचा अंतिम निर्णय जीएसटी परिषद घेणार आहे. देशामध्ये इथेनॉल पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालय मंजुरी देण्यासाठी तयार असल्याचेही गडकरींनी यावेळी सांगितले.