नवी दिल्ली - केंद्र सरकार अर्थव्यवस्था सुधारत असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात चित्र वेगळे असल्याची आकडेवारी समोर आली आहे. देशाचे औद्योगिक उत्पादन हे डिसेंबरमध्ये ०.३ टक्क्यांनी घसरले आहे. उत्पादन क्षेत्राच्या नकारात्मक कामगिरीने औद्योगिक उत्पादन घटल्याचे सरकारी आकडेवारीत दिसून आले.
मागील वर्षाच्या ऑगस्ट (-१.४ टक्के), सप्टेंबर (-४.६ टक्के) आणि ऑक्टोबरमध्ये (-४.६ टक्के) औद्योगक उत्पादनात घसरण झाली होती. या तीन महिन्यांच्या सलग घसरणीनंतर नोव्हेंबरमध्ये १.८ टक्क्यांची औद्योगिक उत्पादन क्षेत्राने नोंद केली होती.
हेही वाचा-'जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी बँकांनी कायम प्रयत्नशील राहणे गरजेचे'
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार डिसेंबर २०१८ मध्ये औद्योगिक उत्पादनाचा वृद्धीदर हा २.९ टक्के होता. डिसेंबर २०१९ मध्ये वीजनिर्मितीचे प्रमाण घसरले आहे. तर २०१८ च्या डिसेंबरच्या तुलनेत डिसेंबर २०१९ मध्ये खाण उद्योगाने वृद्धीची नोंद केली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल-डिसेंबरदरम्यान औद्योगिक उत्पादनाचा दर हा केवळ ०.५ टक्के राहिला आहे. तर वर्ष २०१८-१९ मध्ये औद्योगिक उत्पादनाचा दर हा ४. ७ टक्के होता.
हेही वाचा-केजरीवाल यांच्या 'अर्थपूर्ण' कामगिरीचा विजयासाठी 'असा' झाला फायदा
आयआयपीच्या आकडेवारीबाबत डेलाईट इंडियाच्या अर्थतज्ज्ञ रुम्की मजुमदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, डिसेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन घसरल्याने औद्योगिक चलनवलनातील सुधारणेबाबत चिंता वाढली आहे. हे संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी चांगले नाही. यापूर्वीच सर्व उद्योग हे जागतिक आव्हानांना सामोरे जात आहेत.